प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील 20 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन

सातारा, दि.19 : राज्यातील 511 ग्रामीण भागातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झाले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील 20 केंद्रांचाही समावेश आहे.

कोडोली ग्रामपंचायतीच्या सांस्कृतीक भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमास मुंबई येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री शंभूराज देसाई दूरदृष्य प्रणाली द्वारे तर आमदार महेश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी,ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय मांगलेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवि साळुंखे, अर्चना देशमुख, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कौशल्य विकास हा देशाचा आर्थिक पाया असल्याचे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र कौशल्य मंत्रालयाची निर्मिर्ती केली. ज्यांच्यामध्ये कौशल्य असेल त्यांची अर्थव्यवस्था चांगली असते. आज देश कौशल्य व तंत्रज्ञनाच्या जोरावर प्रगती करीत आहे. विद्यार्थ्यांनी व्यवसायीक कौशल्य आत्मसात करुन गावाच्या विकासाबरोबर देशाच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन आमदार श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

यावेळी सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील कोडोली, लिंब व नागठाणे, कराड तालुक्यातील विंग, सैदापूर, उंब्रज, रेठरे बु, खंडाळा तालुक्यात शिरवळ व पारगाव, खटाव तालुक्यात औंध व पुसेगाव, कोरगाव तालुक्यात वाठार स्टेशन, माण तालुक्यात गोंदवले बु, पाटण तालुक्यात मल्हार पेठ व तारळे, जावली तालुक्यात कुडाळ, फलटण तालुक्यात कोळकी, महाबळेश्वर तालुक्यात भिलार व वाई तालुक्यात यशवंतनगर व भुईंज या ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This