यंत्रणांनी वृत्तपत्रांच्या जाहिरातींची देयके एक महिन्यात अदा करा

– जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

सातारा, दि.26 : सर्व शासकीय यंत्रणांनी दैनिकांच्या जाहिरातींची देयके एक महिन्याच्या आत अदा करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात दैनिकांच्या प्रलंबित देयकांबाबत बैठक संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) शिवाजीराव जगताप, सतिश धुमाळ, जिल्हा खणिकर्म अधिकारी अमोल थोरात, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जाहिरातींच्या देयके अदा करण्यासाठीचा निधी उपलब्ध नसल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी करावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, या बैठकीत असे निदर्शनास आले आहे की, एक विभाग जाहिरात देतो आणि देयके दुसरा विभाग अदा करील असे आदेशित करतो यामध्ये बदल करण्यात येऊन जे विभाग जाहिरात देतात त्याच विभागाने जाहिरातीचे देयक अदा करावेत.

शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे यांनी शासनमान्य यादीवरील दैनिकांना रोटेशन पद्धतीनुसार जाहिराती वितरीत कराव्यात. या नियमाचे काटेकोर पालन करावे. दैनिकांच्या प्रतिनिधींनीही संबंधित यंत्रणांशी भेटून जाहिरात देयकांची पडताळणी करावी व देयक अदा झाले आहे किंवा कसे याची खात्री करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीत बऱ्याच काळापासून प्रलंबित असणाऱ्या वर्तमानपत्रांच्या जाहिरात देयकांची आढावा घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This