लोकशाहीतील सहभाग वाढविण्यासाठी तरुणांनी मतदार नोंदणी करावी

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

सातारा, दि. 3 : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी व लोकशाहीतील त्यांचा सहभाग वाढविणे तसेच मतदार साक्षरता मंच सक्षम करणे यासाठी जिल्ह्यातील 33 महाविद्यालयांशी करार झाला आहे. या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त तरुण मतदारांची नोंदणी करुन मतदान प्रकियेत त्यांना सामिल करुन घ्यावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय महाराष्ट्र राज्य ,जिल्हाधिकारी कार्यालय सातारा व वर्शिप अर्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांसोबत कार्यशाळा व सामंजस्य करार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री. देशपांडे यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, वर्शिप अर्थ फाउंडेशनचे तेजस गुजराती यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व विद्यार्थी उपस्थित होते.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नव मतदारांची नोंदणी 9 डिसेंबरपर्यंत करावी, असे सांगून श्री. देशपांडे म्हणाले, मतदान प्रक्रियेत तरुणांचा सहभाग हा महत्वाचा आहे. यासाठी जिलह्यात जनजागृती कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजित करावे या कामासाठी वर्शिप अर्थ फाउंडेशन समन्वयक म्हणून काम करीत आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या महाविद्यालयांचा सन्मानही करण्यात येणार असल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, ग्रामीण भागातील मतदार हा शहरी भागाच्या मतदारांपेक्षा जागृत आहे. त्यामुळे ज्या महाविद्यालयांबरोबर करार झाले आहेत, अशा महाविद्यालयांनी जानेवारी 2024 पासून शहरी भागात मतदान जागृतीचे कार्यक्रम घ्यावेत. यासाठी आत्तापासूनच नियोजन सुरु करा. या कार्यक्रमांना प्रशासनाचे अधिकारी उपस्थित राहून सर्व सहाकार्य करतील.

तरुणांमध्ये मतदार यादीत नाव नोंदणीबाबत उदासिनता दिसत आहे. विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणीसाठी आपल्या कुटुंब व नातेवाईकांपासून सुरुवात करावी. महाविद्यालयातील तसेच आपल्या परिसरातील एकही तरुण मतदार नोंदणी पासून वंचित राहणार नाही असे काम करावे. भारताची लोकशाही जगातील मोठी लोकशाही आहे, ही लोकशाही अधिक प्रगल्भ करण्यासाठी व पुढे नेहाण्यासाठी तरुणांचा सहभाग महत्वाचा असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी यावेळी सांगितले.

लोकशाहीचा पाया बळकट करण्यासाठी तरुणांनी मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे. मतदार नोंदणीबाबत तरुणांमध्ये जनजागृती करणे महत्वाचे असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This