लोकअदालतीमध्ये एकूण ६२४५ प्रकरणे निकाली

सातारा, दि. ९. : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. ९ डिसेंबर, २०२३ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोक अदालतीस प्रमुख जिल्हा न्यायाधीश, मा. समीर श. अडकर, अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. सर्व पॅनेल प्रमुख न्यायिक अधिकारी व सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय लोक अदालतीकरीता गर्दीवर नियंत्रण करण्याकरीता विशेष पोलीस पथक स्थापन करण्यात आले होते.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात एकूण १०११५ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी प्रलंबित प्रकरणे २१२२ तडजोडीने निकाली निघाली. त्यामध्ये एकूण रक्कम रु.२१,३६,४९,८३६/- रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच वादपूर्व ११९६२ प्रकरणे ठेवण्यात आली, त्यापैकी तडजोडीने ४१२३ प्रकरणे निकाली निघाली. वादपूर्व प्रकरणामध्ये एकूण रु.२,७०,७१,७९१/- एवढी रक्कम वसूल करण्यात आली. लोकअदालतीमध्ये एकूण ६२४५ प्रकरणे निकाली निघाली, दि.०४/१२/२०२३ ते ०८/१२/२०२३ या कालावधीमधील स्पेशल ड्राईव्ह मध्ये सातारा जिल्हामध्ये एकूण ६४९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वैवाहिक वाद, तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी केसेस, भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कर्ज, धनादेश न वठल्याची प्रकरणे इत्यादींचा समावेश आहे. वादपूर्व प्रकरणात फायनान्स कंपन्या, बँकांची कर्ज, दूरध्वनी व विद्युत देयके आणि ग्रामपंचायत मालमत्ता पाणी पट्टी कर वसुली प्रकरणे इ. प्रकरणांचा समावेश होता. जिल्ह्याचे ठिकाणी एकूण ७ आणि तालुका न्यायालयात एकूण २९ पॅनेल करण्यात आले होते. पॅनेल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश, वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश क. स्तर, यांनी काम पाहिले. प्रत्येक पॅनलवर एक विधिज्ञ पॅनल सदस्य म्हणून काम पाहत होते. लोक अदालत यशस्वी होण्याकरीता पक्षकार, विधिज्ञ, सर्व न्यायीक अधिकारी, पोलीस, विधी स्वयंसेवक आणि सर्व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

राष्ट्रीय लोक अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून भविष्यात आणखी प्रबोधन आणि प्रयत्न करणार असल्याचे प्राधिकरणाचे सचिव तथा वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश श्रीमती तृप्ती नितीन जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This